पावनखिंड संग्राम
अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. आदिलशाहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड़ लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जौहर निघाला. फाजलखानाही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला. सिद्दी जौहरने पन्हाळ्याला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळा सुरु झाला कि सिद्दी जौहर वेढा उठविल असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरु होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली.
आता शक्तीचे काम नाही,तर युक्तीने सुटका करून घ्यायचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्दीला पाठवला. त्याने काबुल केले. वेढ्याच्या कामाने सिद्दीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. ते खाणे पिणे गाणे बाजावणे व हुक्कापाणी यात दंग होऊन गेले. शिवरायांनी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर जाणार, दुसरी पालखी शत्रूला सहज दिसल्याने ती पकडली जाणार. आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार,एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार,अशी योजना होती. असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरे जायचे. पण एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेली शीवाजीची पालखी बाहेर पडली. शत्रूने हि पालखी पकडली. आणि त्यांनी ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरु झाला. पण थोड्या वेळाने शिवाजीचे सोंग उघडकीस आले.
तेव्हा सिद्दीने संतापून त्याला ठार केले. शिवरायांसाठी या शिवाजीने बलिदान केले. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे कळताच सिद्दी चवताळून गेला. त्याने मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग केला. शिवरायांनी घोडखिंड ओलांडली. चौताळलेल्या सिद्दीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवराय बाजीप्रभूंना म्हणाले बाजी वेळ आणीबाणीची आहे. आता विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला तोंड देऊया. खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता. स्वराज्य आणि शिवरायांचे जीवित धोक्यात होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. गनिमांची संख्या अफाट आहे. आम्ही खिंड रोखून धरतो. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही शत्रूला येथेच थोपवून धरू. बाजीप्रभूंची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले. पण त्यांना स्वराज्याचे धेय्य गाठायचे होते. शिवराय बाजींना प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील.
मग ताबडतोब तुंही निघून या. बाजी खिंडीच्या तोंडापाशी उभा राहिला. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला जीव गेला तरी गनिमांना खिंड चढू देऊ नका. खिंडीतली वाट नागमोडी होती. एकाच वेळी तीन चार माणसे चढू शकत होती. खिंडीत शर्थीची झुंज सुरु झाली. सिद्दी जौहर चिडला होता. शत्रूने बाजिप्रभूवर हल्ला केला. बाजीला घेरले. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला. पण तो मागे हटला नाही. बाजीप्रभू घायाळ झाला होता,तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. एवढ्यात तोफांचा आवाज कडाडला. बाजींच्या कानी तोफांचे आवाज पडले. महाराज गडावर पोहोचले. आता मी सुखाने मरतो. असे म्हणून त्या स्वामिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. हे महाराजांना कळल्यावर त्यांना खूप मोठे दुःख झाले. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते,म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या
रक्ताने घोडखिड पावन झाली.
No comments:
Post a Comment