Showing posts with label शिवरायांची युद्धनीती. Show all posts
Showing posts with label शिवरायांची युद्धनीती. Show all posts

Tuesday, 27 June 2017

शिवरायांची युद्धनीती




शिवरायांची युद्धनीती


शिवरायांनी वयाच्या पंदराव्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला. अवघ्यां पस्तीस वर्षाचा हा काळ या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केलेस्वराज्यासाठी ते हयातभर लढत राहिले. अत्यंत कठीण प्रसंगी समशेर हाती घेऊन स्वतः लढाईत उतरले. आणि त्यांनी विजय मिळवले. त्यांचे आयुष्य युद्धप्रसंगी भरलेले आहे. स्वराज्यावर अनेक संकटे आली,पण शिवरायांनी प्रसंग पाहून आणि दूरवरचा विचार करून त्यांनी तोंड दिले. शिवराय पराक्रमी होते,तसेच थोर मुत्सद्दीही होते.


शक्ती कमी पडली,तेव्हा शिवरायांनी युक्ती चालवली. अफजलखान म्हणजे तुफान ताकदीचा वीर, पण शिवरायांनी त्याची बेधडक भेट घेतली. आणि त्याचा निकाल लावला. धोधो पावसात दाट काळोखात शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यातून बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात शास्ताखानावर छापा घालून त्यांनी त्याची खोड मोडलीआग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतुन शिवराय किती युक्तीने निसटले. त्यांच्यासारखा धाडसी आणि मुत्सद्दी सेनानायक सापडणे कठीण. शिवराय स्वतः शूर योद्धे होते. त्यांनी आपल्या सरदारांनाही शूर बनवले. सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा होती. वीर बाजी पासलकर पुरंदर किल्ल्याच्या जवळील खळद बेलसरच्या लढाईत धारातीर्थी पडले. शहाजीराजांनी कान्होजी जेधेंना मावळातील देशमुखांना सोबत घेऊन शिवरायांच्या पाठीशी राहण्यास सांगितले. त्यांनी स्वराज्यस्थापनेच्या कामी आयुष्यभर शिवरायांना साथ दिली. फिरंगोजी नरसाळा याने चाकनचा किल्ला उदार होऊन लढवला. सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातलातेव्हा सिद्दी हिलाल आणि त्याचा पुत्र शिवरायांच्या बाजूने लढले. शिवरायांना वाचवण्यासाठी बाजीप्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली. तानाजीने मुलाचे लग्न टाकून कोंढाणा घेण्यासाठी प्राणार्पण केले.


सेनापती प्रतापराव गुजर याने आदिलशाही सरदार बहलोलखानाशी लढताना हौतात्म्य पत्करले. प्रतापराव गुजर यांच्यानंतर शिवरायांनी हंबीरराव मोहिते याची सरसेनापती म्हणून नेमणूक केली. त्याने अनेक लढायांमध्ये पराक्रम केला. तसेच जालना स्वरीच्या वेळी शत्रूशी लढताना सेनानायक सिंधोजी निंबाळकर याने प्राणार्पण केले. महाराजांच्या सेवकाने दाखवलेल्या स्वामीनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणे आहेत. शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते. शत्रूंजवळ अफाट फौजा होत्या,भरपूर दारुगोळा होता,शेकडो तोफा होत्या,पण शिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूच्या बलाढ्य सैन्याबरोबर कसे लढणार. उघड्या मेदानावर शत्रूशी कसा सामना देणार. तेव्हा शिवरायांनी विचार केला कि महाराष्ट्र हा डोंगराळ मुलुख आहे. इथे डोंगर,घाट खिंडी पुष्कळ आहेत. त्यांचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. हे सारे लक्षात घेऊन शत्रूशी सामना कसा द्यावा हे शिवरायांनी ठरवले. शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर सामान असे. ते आवरून लढाईला निघायला त्यांना वेळ लागे. उलट मराठे घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे. पाठीला ढाल,कमरेला तलवार,हातात भाला एवढेच त्यांचे सामान. पाहता पाहता ते डोंगर चढत उतरत

शिवरायांचे मावळे चपळ काटक होते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून शिवरायांनी शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्याचे शक्यतो टाळले. यात त्यांची केवढी मुत्सद्देगिरी दिसून येते. शत्रूच्या गोटात गुपचूप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रुपक्षाची खडानखडा माहिती मिळवत. मग शत्रूवर अचानक हल्ला करत. बेसावध शत्रूची दाणादाण उडवत. शत्रू लढाईला तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या वेगाने दिसेनासे होत. डोंगराळ भागात अशा लपून छपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली. यालाच गनिमी कावा म्हणतात. शिवरायांनी गनिमी काव्यानेच बादशाहाच्या प्रचंड फौजेचा धुव्वा उडवला. शिवरायांची डोंगरी किल्ल्यांवर अधिक भिस्त होती. किल्ला तांब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे सोपे जात असे. किल्ल्यावर अन्नधान्य दारुगोळा याचा भरपूर साठा ठेवला कि मग शिवरायांची किल्ल्यावरील लहानशी फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला दोन-दोन वर्षे दाद देत नसे. शत्रू ताकदवान असला,तरी किल्ल्याचा आश्रय घेतला जात असे

शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही. ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली. आणि नंतर राजधानीसाठी रायगडाची निवड केली,याचे इंगित हेच होत. किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडावर भिन्न  भिन्न  जाती जमातीची माणसे नेमली. त्यामुळे कामे सुरळीत पार पडत. शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे. यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी होती. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पैसा उभारणे आवश्यक होते. शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारत. शत्रुच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा शिवराय घेत,त्यास चौथाई म्हणत. चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या फौजा त्रास देत नसत. चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सिद्दी,पोर्तुगीज,इंग्रज यांच्यापासून स्वराज्याला धोका होण्याचा संभव आहे,हे शिवरायांनी ओळखले होते,म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग,विजयदुर्ग,यासारखे भक्कम किल्ले बांधले. ते पाहिले कि आजही आपले मन थक्क होते. स्वराज्यावर केवढी संकटे आली,पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले,म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले.