गनिमी कावा
शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते. शत्रूजवळ अफाट फौजा होत्या,भरपूर दारुगोळा होता,शेकडो तोफा होत्या,
पण शिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूच्या बलाढ्य सैन्याबरोबर कसे लढणार. उघड्या मैदानावर शत्रूशी कसा सामना देणार तेव्हा शिवरायांनी विचार केला,की महाराष्ट्र हा डोंगराळ मुलुख. इथे डोंगर,घाट व खिंडी पुष्कळ आहेत. त्यांचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे. हे सारे लक्षात घेऊन शत्रूशी सामना कसा द्यावा हे शिवरायांनी ठरवले . शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर सामान असे.
ते आवरून लढाईला निघायला त्यांना वेळ लागे. उलट मराठे घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे. पाठीला ढाल, कमरेला तलवार, हातात भाला एवढेच त्यांचे सामान. पाहता पाहता ते डोंगर चढत व उतरत. शिवरायांचे मावळे चपळ व काटक होते . या साऱ्या गोष्टीचा विचार करून शिवरायांनी शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्याचे शक्यतो टाळले,यात त्यांची केवढी मुत्सद्देगिरी दिसून येते. शत्रूच्या गोटात गुपचुप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रुपक्षाची खडानखडा माहिती मिळवत. मग शत्रूवर अचानक हल्ला करत. बेसावध शत्रूची दाणादाण उडवत. शत्रू लढायला तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या वेगाने दिसेनासे होत. डोंगराळ भागात अशा लपून छपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली. यालाच 'गनिमी कावा 'म्हणतात. शिवरायांनी गनिमी काव्यानेच बादशाहाच्या प्रचंड फौजांचा धुव्वा उडवला. शिवरायांची डोंगरी किल्ल्यांवर अधिक भिस्त होती. किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे सोपे जात असे. किल्ल्यावर अन्नधान्यं व दारुगोळा यांचा भरपूर साठा ठेवला म्हणजे झाले . मग शिवरायांची किल्ल्यावरील लहान फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला दोन दोन वर्षे दाद देत नसे. शत्रू ताकदवान असला,तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत असे.
शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही. ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली. किल्ल्यांच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडावर भिन्न भिन्न जातीजमातीची माणसे नेमली. त्यामुळे कामे सुरळीत पार पडत. शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे. यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी होती. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठो पैसा उभारणे अश्यक होते. शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारत. शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत,त्यास चौथाई म्हणत. चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या फौजा त्रास देत नसत . चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.आरमारदल उभारले : सिद्दी ,पोर्तुगीज, इंग्रज यांच्यापासून स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे,हे शिवरायांनी ओळखले होते, म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग,विजयदुर्ग यासारखे भक्कम सागरी किल्ले बांधले. ते पाहिले,कि आजही आपले मन थक्क होते. स्वराज्यावर केवढी संकटे आली, पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले,म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले.
No comments:
Post a Comment