Monday 5 June 2017

शिवाजी महाराजांचा जन्म (Shivaji Maharaj Birth)


फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१  १९फेब्रुवारी १६३०. शिवनेरीच्या नगारखाण्यात सनई, चौघडा वाजत होता अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले . शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुगल बादशाहाशाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते.शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर  शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या, तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्यातील जुन्नरजवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे,भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले. ते मुघलांवर चालून गेले

शिवरायांचे बालपण

शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली,पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना  उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत. शिवबांना जवळ घेत,मायेने कुरुवाळात,त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या,भीमाच्या नि अभिमन्यूच्या  गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे,कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रातील गोष्टीही  सांगत. त्यातून शिवरायांना साधुसंतांविषयी  आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाहि त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत.
मावळ्यांची मुले जणू रानातील पाखरे ती पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती घोडे बनविणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद  लपंडाव, चेंडू, भोवरा हे यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलाबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फारफार आवडायचे.

शिवरायांचे शिक्षण

स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमनूक केली होती . शिवराय सात वर्षांचे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत,भागवत यातील गोष्टीं ते स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसने,कुस्ती खेळणे,दांडपट्टा फिरवणे,तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत शिवरायांना विविध विद्या कला यांचा परिचय झाला. लवकरच आदिलशाहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्या वेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती,घोडे,पायदळ,खजिना,ध्वज,तसेच विस्वासू प्रधान,शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले.

स्वराज्याची शपथ

पुण्याच्या नैऋत्येला असलेले  रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली शिवराय आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर्र अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते,पण यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा  घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सगळ्यांना ते कळकळीने म्हणाले, ''गड्यानो,मी आज तुमहाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे. पण गड्यानो,मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का. दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का. आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात.

आपली माणसे या युद्धात नाहक मारतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते. आणि इतके सोसुनही आपल्या पदरी  काय. तर गुलामगिरी  आपण हे किती दिवस सहन करायचे. दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे. सांगा, तुमीच सांगा   वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू दयायचे का. शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहेरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला,"बोला बाळराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. "हो राजे,तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू  आमचे प्राणही देऊ.

मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले,
''गड्यानो  आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे,सर्वांनी खपायचे,सर्वांनी प्राण अर्पन करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे 'हिंदवी स्वराज्यतुमचे ,माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे.परक्यांची गुलामी आता नको. उठा,या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. ''हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे,असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.''शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले,ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले.

घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्यधन्य वाटले. आपण मणी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा,असा विस्वास त्यांना वाटू लागला. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी,डोंगरातील आडमार्ग शोधावे,खिंडी,घाट,चोरवाटा निरखाव्या,आसा त्यांचा नित्यक्रम सुरु झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरने जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे, असे ते मानू लागले. आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले,समुद्राला भरती यावी तसे.शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट,किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले. चोरवाटा,भुयारे,तळघरे,दारुगोळा,हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली. 

तोरणा गड स्वराज्याचे तोरण

रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली,पण केवढे अवघड कार्य होते ते, दिल्लीचा मुघल बादशाह,विजापूरचा आदिलशाही सुलतान,गोव्याचे पोर्तुगीझ आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर  हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा  मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिम्मत नव्हती. अशा  बिकट परीस्तीथत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र  उच्चारला होता. कुठे शत्रूच्याफौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ पण शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले.

शिवरायांकडे पुणे,सुपे,चाकण इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधीकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य, ज्याचे किल्ले त्याचे राज्य, किल्ला  ताब्यात असला,कि आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम  किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे,असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ठ किलोमीटरवर कानद खोऱ्यात  हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागांची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकाच वाट आहे. ती आहे झुंजारमाचीवरून. हि वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार ! महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. किल्ल्यावर तोरनजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा 'हे नाव पडले. एवढा प्रचंड किल्ला ! पण आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर
पुरेसे पहारेकरी नव्हते,कि दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे,असे त्यांनी ठरवले. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शीवराय कानद खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिहाच्या छातीने हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्याचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावाण सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली.नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड' असे नाव दिले.

कुलस्वामिनी आई भवानीचा आशीर्वाद

तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरु झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या. शिबंदीत मावळे,कोळी,रामोशी,महार इत्यादी जातीजमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद,
वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. किल्ल्याची दुरुस्ती सुरु झाली आणि काय आश्चर्य  मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी, काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या  कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला. 'शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे,तिनेच धन दिले 'असे जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनांच्या घागरी शिवरायांजवळ आणून  दिल्या. एका मोहोरेलाही  कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते  ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आईभवानीचा आशीर्वाद आहे, असे त्यांना वाटले.  

हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली. दारुगोळा जमा केला. उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्यास ठरवले. तो बेत असा. तोरण्यापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे. शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खुप उंच,अवघड आणि मोक्याचा
होता. आदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता, तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले.

स्वराज्याची पहिली राजधानी

एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले 'राजगड' गडावर पाथरवटांनी दगड घडवले. लोहाराने भाता फुंकला. सुतार ,गवंडी ,मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा,बारा महाल,अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड हि स्वराज्याची पहिली राजधानी सजली. शिवरायांची घोडदौड सुरु झाली. बारा मावळांतील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. बारा मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला. गावोगावचे पाटील,देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले ;परंतु तांदळात जसे काही खडे असतात,तसे मावळातही काही दुष्ट लोक होते. शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या. ठाणेदाराने विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली.

क्रमश:

No comments:

Post a Comment